राज्य संकटात असताना मुख्यमंत्री घरात, राष्ट्रपती राजवट लागू करा : खा. नवनीत राणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राज्यातील कोरोना संकट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचे अमरावीच्या खासदार नवनीत राणांनी सांगितलं. राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून आहेत. ते मातोश्रीवर बाहेर पडायला तयार नाहीत. इतर मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यामध्ये फिरत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानाबाहेर निघत नाहीत त्यामुळेच राज्यातील परिस्थिती भीषण झाल्याचं त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संकटात बाहेर पडत नसल्याचे म्हटले होते. त्यावरही राणा यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल वेगळा असतो. इतर राज्यांचे मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात फिरत आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आरोग्य व्यवस्था उत्तम राखण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे घरातच बसले आहेत, ते मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका राणा यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत करणार आहे. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा, त्याशिवाय सुधारणा होणार नाही असेही राणा यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैनीचा उल्लेख केला. शरद पवार एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते 80 वर्षांचे आहे. मात्र, या परिस्थितीतही ते राज्यभर फिरतात. विविध जिल्ह्यांचा आढावा घेतात, असे राणा यांनी सांगितले.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रगचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार रडारवर आहेत. यावरून लोकसभेतही वादळी चर्चा सुरु आहे. त्यावर राणा यांनी भाष्य केलं. संपूर्ण इंडस्ट्री तशी नाही, याची मला जाण आहे. मी देखील इंडस्ट्रीत काम केलं आहे. पण अनेक मोठ्या कुटुंबातील कलाकार ड्रग्ज घेतात. काही वर्षापूर्वी ड्ग्ज प्रकरणात क्रिकेटपटूंची नावं देखील यामध्ये समोर आली होती. त्यामुळे काहींवर आजीवन बंदी घातली गेली होती, असेही राणा यांनी सांगितले.