…तर शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार : विनायक मेटे

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याची उंची २२१ मीटर असल्यास शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार केला जाईल असे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे. आधीच पुतळ्याची उंची कमी करत तलवारीची उंची वाढवल्याने राज्य सरकारवर टीका झाली होती. त्यात आता विनायक मेटे पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी करत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा जगात सर्वात उंच असावा अशी शिवप्रेमींची भावना असताना अयोध्येत प्रभू श्रीरामाचा २२१ मीटर उंच पुतळा उभा राहणार असल्यास शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार केला जाईल असे मेटे म्हणाले.

शिवसंग्रामच्या जिल्हा मेळाव्यात ते जालन्यात बोलत होते. मेटे म्हणाले, उत्तर प्रदेशात प्रभू श्रीरामाची २२१ मीटर उंच मूर्ती उभारली जाणार असल्याचे मला समजले. जर ही बातमी खरी असेल तर शिवस्मारकाच्या उंचीबाबत आम्ही पुनर्विचार करु. आम्ही सरकारकडे पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी करु. शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे त्यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असावा अशी शिवप्रेमींची भावना आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाचा पुतळा उभारणार असल्याचे जाहीर केले होते. या पुतळ्याची एकूण उंची १५१ मीटर असणार आहे. तसंच त्यावरील छत २० मीटर आणि ५० मीटरचा पाया असणार आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची २२१ मीटर असणार आहे. या उंची वरूनच मेटे यांनी शिवस्मारकाच्या उंचीबाबत वक्तव्य केले आहे.

शिवस्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांधकाम खर्चात कपात कऱण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर केली आहे. तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे.