मुंबई समूह संक्रमणाबाबत ICMR शी चर्चा करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मुंबईतील परिस्थितीही अजून पूर्वपदावर आलेली नाही. मुंबईत दररोज 1 हजारच्या सरासरीने रुग्ण आढळून येत असून, रुग्णसंख्या 1 लाख 13 हजारांवर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत समूह संक्रमण झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात आयसीएमआरशी चर्चा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या अहवालाबद्दल आयसीएमआरशी चर्चा करणार आहे. मुंबई संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचले आहे का? याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल.

समूह संक्रमण आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर या दोन संस्थाच महाराष्ट्र आणि देशातील समूह संक्रमणाविषयी सांगू शकतात. त्यांच्याकडे तज्ज्ञ आहेत, असे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात संक्रमण जास्त झाल्याचे दिसून आले आहे. . चांगल्या वसाहतींमध्ये हे संक्रमणाचे प्रमाण 15 ते 16 टक्के इतकच आहे. अद्याप आम्ही हे म्हणू शकत नाही की, संपूर्ण शहरात किंवा राज्यात समूह संक्रमण झाले आहे. मुंबईतील चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली असून आतापर्यंत 6297 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.