दंडुक्याला सूर्य नमस्कारानं उत्तर देईल, PM मोदींचा राहुल गांधींवर ‘पलटवार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा मोदींनी समाचार घेत प्रत्युत्तर दिले आहे. सहा महिन्यात मला दंडुक्याचा मार बसेल असे काही लोक म्हणतात. त्यामुळे सहा महिन्याची सवड असल्याने मीही दंडुक्याला सूर्य नमस्काराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सहा महिने सूर्य नमस्काराची संख्या वाढवेल. त्यामुळे माझ्या पाठिवर दंडुक्याचा काहीच परिणाम होणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या प्रत्येक मुद्याचा समाचार घेतला. दिल्ली निवडणुकीचा प्रचार करताना राहुल गांधी यांनी एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले होते. हे जे नरेंद्र मोदी भाषण देत आहेत, 6 महिन्यानंतर ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. भारताचा तरुण त्याला अशा काठीने मारहाण करेल, मग त्यांना समजेल की हा देश भारताच्या तरुणांना रोजगार दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, असे विधान केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता प्रत्युत्तर देताना, दंडुक्याला सूर्य नमस्काराने उत्तर दिले जाईल असे म्हटले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावेळी राहुल गांधी यांनीही काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिशेने इशारा करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही केला. सभागृहातील गोंधळावर बोलताना मोदी म्हणाले, मी 30 ते 40 मिनीटांपासून बोलतोय. पण करंट तिथे पोहचण्यास वेळ लागाला. यांचं असंच असतं असे म्हणत त्यांनी चिमटा काढला.