मोठी बातमी ! मागील 5 वर्षातील ‘अन्यायकारक’ गुन्हे मागे घेणार, मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील 5 वर्षात दाखल झालेले सर्व अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाही राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेली ही मंत्रिमंडळाची बैठक चार तास चालली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विविध प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात गेल्या पाच वर्षात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येईल. गुन्हे मागे घेताना कोण कोणत्या पक्षाचा हे पाहिले जाणार नाही असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे ठरवण्यात येईल. परंतू राज्यातील एकाही विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली नाही. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, पावसाने झालेल्या या नुकसानावरही चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

खासदार छत्रपती संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हा मागे घेण्याची मागणी केली होती. याआधी नितीन राऊत आणि जोगेंद्र कवाडे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भीमा कोरेगाव आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. गेल्या सरकारनेच भीमा कोरेगाव आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले असून त्या आदेशाची अमंलबजावणी झाली की नाही याचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

Visit : policenama.com