संजय राठोड यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘गोत्यात’ येणार ? भाजपच्या ‘या’ दिग्गजानं ट्विट केल्यानं खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार प्रताप सरकारईक यांच्या विरोधात मोहीम उघडलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 1) संजय राठोड आऊट, पुढील 2 दिवसांत शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा पुराव्यांसह समोर आणणार असे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आले असून राठोड यांच्यानंतर कोणाचा नंबर लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

किरीट सोमय्या पुन्हा सोमवारी (दि. 1) ईडी कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणातील महत्वाची माहिती ईडी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. त्यानंतर येत्या 2 दिवसांत शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र सोमय्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये शिवसेना नेत्याच्या नावाबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत. हा नेता नेमका कोणत्या भागातला आहे, याबद्दलही त्यांनी काही नमूद केले नाही. सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टॅग केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा कोणता नेता अडचणीत येणार याची जोरदार चर्चा विधिमंडळात पाहायला मिळत आहे.