पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. चित्रपटांमध्ये पोलीसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडली जाते. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

देशातील सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांच्या आयोजित तीन दिवसीय परिषदेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झाला. यावेळी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) हे ही परिषद पार पडली.

परिषदेच्या समारोपानंतर रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जनतेच्या रक्षणासाठी शहिद जवानांचे स्मरण करणे आवश्यक आहे. या सन्मानासाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक देशवासियांनी स्मारकाला भेट दिली पाहिजे, असेही यावेळी रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक जिल्हापातळीवर शहीदांचे स्मारक उभारण्यासाठी जागेची उपलब्धता करुन निधी दिला जाणार आहे. त्याद्वारे पोलिसांचे बलीदान जनतेसमोर आणले पाहिजे.

पोलीस दलातील एखाद्याच्या चुकीमुळे सद्यःस्थितीत अनेक चित्रपटांमधून चुकीचे सादरीकरण केले जाते. मात्र, सण-उत्सवात आणि कौटुंबिक समारंभात सहभागी न होता पोलीस कर्मचार्‍यांसह अधिकारी 300 दिवसांपेक्षा जास्त दिवस कर्तव्यावर हजर असतात, असे यावेळी रेड्डी यांनी आर्वजुन सांगितले.

Visit : Policenama.com