गुलाम नबी आझाद भाजपामध्ये प्रवेश करणार की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बनणार ? PM मोदींनी प्रशंसा केल्यानंतर चर्चेला उधाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील सदस्यत्वचा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भावूक झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. आझाद यांच्यासह पीडीपीच्या दोन नेत्यांच्याही राजकीय भविष्याबाबत विचार केला जात आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची स्तुती करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. त्यानंतर आझाद यांच्या पुढील राजकीय जीवनाविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) उमेदवार म्हणून काही लोक पाहत आहेत. तर काही लोक काँग्रेसच्या G-23 चा हवाला देत आझाद यांना जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा संभाव्य चेहरा मानत आहेत. तिथं सरकारकडून निवडणूक आयोजित करण्याचा विचार आहे.

तसेच इंग्रजी दैनिक ‘द ट्रिब्यून’नुसार, सूत्रांची माहिती अशी आहे, की जम्मू भागात भाजपच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. मात्र, त्यांच्याकडे खोरे येथील भागात नेतृत्वाची कमतरता आहे. जर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या गोंधळावर पंतप्रधान मोदींचे उत्तर वाचले तर काही तर्क लावता येऊ शकतो.

71 वर्षांचे आहेत गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद हे सध्या 71 वर्षांचे आहेत. तसेच भाजपने राजकीयदृष्ट्या निवृत्त होण्याचे वय 75 वर्षे निश्चित केले आहे.

मी कट्टर काँग्रेसचा : आझाद

भाजप प्रवेशावर चर्चा केली जात असताना गुलाम नबी आझाद यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, की ‘मी एक कट्टर काँग्रेसचा आहे. माझा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येवो, अशी माझी इच्छा आहे. मी काँग्रेसचा म्हणून जन्माला आलो आहे आणि काँग्रेसचा म्हणूनच मरेन’.