बेड देतो पण ऑक्सिजन तुम्ही आणा, महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील सिव्हीलच्या सल्ल्यानं रूग्णाचा बळी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. दररोज 20 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून येत असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 लाखाच्या आसपास गेली आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना रुग्णांना बेड मिळवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. मिरज सिव्हिलमध्ये बेड देतो पण, ऑक्सिजन सिलिंडर तुम्ही आणा असा अजब सल्ला रुग्णांच्या नातेवाईकांना दिला. ऑक्सिजन सिलिंडर शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

रुग्णाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी करावी आणि मिरज सिव्हिलमधील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी मदनभाऊ युवा मंचने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली आहे. मदनभाऊ युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे म्हणाले, महापालीका क्षेत्रात तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्यावर उपचारासाठी यंत्रणा कमी पडत आहे. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नाहीत. सांगली आणि मिरज सिव्हिलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स नसल्याचे सांगून रुग्णांना वेठीस धरण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लेंगरे यांनी सांगितले की, शासकीय आणि खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाला पुढील उपचार मिळण्यासाठी प्राथमिक उपचार तसेच ऑक्सिजन देण्याची जबाबदारी डॉक्टरांनीच पार पाडली पाहिजे. फक्त दाखल रुग्णावरच उपचार करण्याच्या हट्टाने दारात आलेला रुग्ण तास न तास रुग्णवाहिकेच तिष्ठत थांबल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सांगली, मिरजमध्ये सिव्हिलच्या दारात उपचाराअभावी 8 ते 10 जणांचे बळी गेले असल्याची माहिती लेंगरे यांनी दिली.

सांगली, मिरज सिव्हिलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ असल्याने तेथे किमान दोन्ही मिळून 500 बेड वाढवावेत. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळतील. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले असल्याचे लेंगरे यांनी सांगितले.