इंदापूरला तिसरा आमदार मिळणार ? हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता

इंदापूर :  पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पारंपारिक विरोधक असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी हर्षवर्धन यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजप पक्षीय बळानुसार 4 जागा लढविणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मोठे यश मिळवल्याने 2014 मध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नसल्याने सत्तास्थापनेसाठी लागणारे संख्याबळ भाजपला मिळाले नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील उदयनराजे भोसले यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातून बारामती लोकसभा मतदारसंघातील ताकद वाढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागू शकते. पाटील यांचे समर्थक बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनीही जाहीर कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे निवड झाल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याचा झालेला पश्चाताप पाटील यांचा दूर होणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांची भाजपच्या वतीने विधानपरिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागली तर इंदापुर तालुक्याला तीन आमदार मिळणार आहेत. तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी व मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने सध्या कार्यरत आहेत.