गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

नाशिकः पोलीसनामा ऑनलाईन – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते आहे. पण आगामी निवडणुकांसाठी मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी टाळी देण्यास तुर्तास नकार दिला आहे. तसेच राज ठाकरे यांनी सांगितले की मी मास्क वापरणार नाही. त्यांनी मास्क वापरला पाहिजे. पण, तरीही ते मास्क वापरत नाही मात्र मी मास्क नियमित वापरतो, अशी कोपरखळी महाजन यांनी राज ठाकरेंना लगावली.

गिरीश महाजन यांनी शनिवारी (दि. 6) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत नाशिक महापालिका आणि राज्यातील विविध मुद्यांवर भाष्यं केले. नाशिक पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. विकासकामांच्या निधीसाठी राज्य सरकारकडून भेदभाव होत आहे. योग्य तो निधी राज्य सरकार देत नाही म्हणून केंद्र सरकारकडून निधी आणून कामे करावी लागत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. नाशिक पालिकेत पुन्हा स्पष्ट बहुमत भाजपला मिळणार आहे, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला आहे. तसेच स्फोटकांची गाडी सापडलेल्या गाडीमालक मनसुख हिरेनला सुरक्षा द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागणी केली होती. पण त्याच दिवशी दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. जर त्यांना वेळीच सुरक्षा दिली असती तर हा प्रकार घडला नसता. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे, अशी टीका महाजन यांनी केली आहे.