जुलैमधील JEE आणि NEET च्या परीक्षा रद्द होणार ? HRD मंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून याचा फटका सर्वांनाच बसला आहे. शिक्षण विभागाला देखील कोरोना विषाणूचा फटका बसला असून अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत तर काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न समोर उभा आहे. अशातच JEE आणि NEET च्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत आहे.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी ट्विटकरून जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या JEE आणि NEET च्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, एनटीए उद्या या संदर्भात बाजू मांडणार आहे. एनटीए आणि इतर तज्ज्ञ याबाबत चर्चा करून उद्या आपली बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोखरियाल गुरुवारी म्हणाले की, जुलै 19 आणि जुलै 23 रोजी जेईई आणि 26 जुलै रोजी नीटच्या परीक्षांचे शेड्यूल करण्यात आले आहे. ही परीक्षा देणारे 30 लाख विद्यार्थी सध्या गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. देशातील कोरोनाचा कहर पाहता परीक्षा ठरवलेल्या तारखेला होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. मात्र अद्याप या विषयासंदर्भात नेमका निर्णय घेण्यात आला नसून परीक्षांबाबत नेमका निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.