मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार का? अजित पवार म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची देखील बदली होणार का अशा चर्चा रंगताना दिसल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत कोणतेही ठोस पुरावे हाती लागत नाही, तोपर्यंत अधिकारी काम करत राहतील असं पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईत पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.

‘कोणत्याही प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, योग्य करावाई होईल’

अजित पवार म्हणाले, राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. योग्य ती करावाई केली जाईल. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता धागेदोरे कुठे जातात हे पाहत आहोत. परंतु अधिकारी बदली हा राज्याच्या प्रमुखांचा निर्णय आहे.

‘जोपर्यंत ठोस पुरावे हाती येत नाहीत, आहे तेच अधिकारी आपलं काम करतील’

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली केली जाणार का असा प्रश्न केल्यानंतर अजित पवार म्हणाले, जोपर्यंत ठोस पुरावे हाती येत नाहीत तोपर्यंत आहे तेच अधिकारी आपलं काम करत राहतील असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

‘शरद पवार साहेब नाराज नाहीत, त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही’

पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. नियमितपणे होणारी ही बैठक होती. आमच्या कामकाजाचा तो भाग होता. शरद पवार साहेब नाराज नाहीत. त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. एकमतानं निर्णय घेण्यात आले आहेत असंही पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

‘चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका, वाझेंबाबत तातडीनं कारवाई केलीय’

अजित पवार असंही म्हणाले, चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका. सचिन वाझेंबाबत आम्ही तातडीनं कारवाई केली. एनआयए त्यांचं काम करत आहे. तर एटीएस त्यांचं काम करत आहेत. तपासात जे सत्य समोर येईल त्यनुसार पुढील कारवाई केली जाईल.