बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री ?, नितीश कुमार यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला ?

पोलीसनामा ऑनलाइन – मिनिटा मिनिटाला बदलणारे आकडे, उमेदवार नेत्यांची घालमेल आणि ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे समर्थकांत आशा-निराशेचे चित्र, अशी उत्कंठावर्धक लढत मंगळवारी बिहारच्या सारीपाटावर रंगली. पहाटेपर्यंत सुिरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर २४३ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएने १२५ जागा जिंकल्या. १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजप दुसरा सर्वांत मोठा पक्ष बनला, तर नितीश कुमार यांच्या जदयुला ४३ आणि मित्र पक्षांना ८ जागांवर समाधान मानावे लागले. त्याने आता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमारचा विराजमान होतील हे स्पष्ट झालं.

मात्र, नितीश कुमार यांना देण्यात येणारे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे दिले जाईल की, नवीन चर्चेतून दुसरा मार्ग काढला जाईल, याबाबत बिहारमधील भाजप नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे. त्याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता तरी मुख्यमंत्रिपदाची माळ नितीश कुमार यांच्या गळ्यात पडली तरी नंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसेल का ? भाजपने नितीश यांना दिलेले ते आश्वासन जुमलाचं ठरणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

“आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने पूर्वीच नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनतील असे जाहीर केल्याने, आम्ही सहकारी पक्ष म्हणून काम करण्याचं निर्णय घेतला. आमचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएचे नेतृत्व नितीश कुमार करतील म्हटले. त्यामुळे तोच आमचा निर्णय आहे,” असे मत बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी स्पष्ट केलं. तसेच नितीश कुमारच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील का या प्रश्नावर ते म्हणाले, “जर आमच्या पंतप्रधानांनी तसे म्हटलं आहे तर तेच राहतील.”

“हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असून, आम्ही दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नितीश कुमार यांना देणार आहोत. पण याबद्दल काय निर्णय घ्यायचा हे नितीश कुमार त्यांच्या तत्त्वानुसार ठरवतील,” असे मत भाजपचे नेते संजय पासवान यांनी व्यक्त केलं, तर दुसरीकडे “मंत्रिमंडळ आणि खातेवाटप हे प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागेनुसार ठरवले जाईल,” असं भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे.

तथापि, महाराष्ट्रात झालेल्या सत्तासंघर्षानंतर आपली प्रतिमा जपण्यासाठी भाजप यंदा मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत अडवणूक करणार नाही, असे मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं, तर मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याविरुद्ध रोष आहे. त्यामुळेच भाजपच्या अटी मान्य करण्याशिवाय जदयुकडे पर्याय नव्हता, असे मत काही जाणकारांनी सांगितलं. राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक पक्षांसोबत युती करून त्यांना कमजोर करण्याचे धोरण मागील काही वर्षांपासून अवलंबलं आहे. भाजपने महाराष्ट्रात शिवसेना तर पंजाबात अकाली दलासोबत युती करून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही पक्षांनी युती तोडली.

दरम्यान तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाममध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पाहता भाजपला जदयुने लहान भावासारखी सत्ता भोगावी अशी अपेक्षा असेल.