‘दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करु देणार नाही’ : इम्रान खान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपलं सरकार देशाबाहेरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करू देणार नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान हे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झाले. आधीच्या पाकिस्तान सरकारने दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना खतपाणी आणि आश्रय दिल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, “आधीच्या कोणत्याही सरकारने दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही.” दरम्यान इम्रान खान यांनी असे वक्तव्य करत एक प्रकारे पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत अशी कबुलीच दिली आहे.

सिंध प्रांतातील एका सभेत बोलताना इम्रान खान म्हणाले की, “तहरीक-ए-इन्साफ पक्षाचं सरकार आल्यापासून आम्ही राष्ट्रीय योजना तयार करुन त्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत. याअंतर्गत दहशतवादाशी सामना करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे.”

पाकिस्तानने १८२ मदरसे नियंत्रणात घेतले असल्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या १०० दहशतवाद्यांना अटक केली आहे. याेग्य नियाेजन करून ही कारवाई केली असल्याचे पाकिस्तानच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईची तीव्रता वाढवली आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता कारवाईला सुरुवात केली आहे असे पाकच्या मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.