‘त्या’ आमदारांना रस्त्यावर फिरु देणार नाही : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात घडलेल्या या अनपेक्षित राजकीय घटनेने महाराष्ट्रातील जनता आश्चर्यचकित झाली आहे तर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या सर्व घटनांवर संतप्त प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की , अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला. या बंडखोर आमदांना रस्त्यावर फिरु देणार नाही.

संजय राऊत म्हणाले की , ‘अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. अजित पवरांनी शरद पवरांसोबत महाराष्ट्राला धोका दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला, बंडखोर आमदांना रस्त्यावर फिरु देणार नाही.’

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तीक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी आज सकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली. अजित पवारांच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रवादीचे 15 आमदार उपस्थित होते.

Visit : Policenama.com