नाकात लिंबाच्या रसाचे 2 थेंब टाकल्यास नष्ट होईल कोरोना? जाणून घ्या या दाव्याची सत्यता

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असतानाच लोक घरच्या घरी संसर्ग रोखण्यासाठी नवनवीन उपाय करून पहात आहेत आणि विविध प्रकारचे तोडगे सोशल मीडियावर वायरल होत आहेत. परंतु कोणताही उपाय करण्यापूर्वी त्याबाबत सविस्तर माहिती घेतली पाहिजे. कारण या गोष्टी तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतात. यासाठी कोरोनाच्या उपचारासाठी कोणताही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खुपच वायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, नाकात लिंबूरसाचे दोन थेंब टाकल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग ताबडतोब नष्ट होईल. हा व्हिडिओ अशावेळी वायरल होत आहे, जेव्हा देशात कोरोनाची विक्रमी प्रकरणे आणि मृत्यू नोंदले जात आहेत. देशाच्या तमाम राज्यांमध्ये अठरा वर्षावरील सर्व लोकांना व्हक्सीन देण्यास सुरूवात झाली आहे. परंतु खरोखरच नाकात लिंबूरस टाकल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग दूर होतो का?

जाणून घ्या काय आहे दावा

सोशल मीडियावर वायरल या व्हिडिओत एक टीळाधारी बाबा दावा करत आहे की, एक लिंबू घ्या आणि त्याच्या रसाचे दोन-तीन थेंब नाकात टाका. हे टाकल्यानंतर अवघ्या 5 सेकंदात तुम्हाला दिसेल की तुमचे नाक, कान, गळा आणि हृदय, सर्व भाग शुद्ध झाले आहेत. तुमचा गळा जाम आहे, नाक जाम आहे, घशात वेदना होत आहेत किंवा इन्फेक्शनमुळे ताप आहे, हा उपाय सर्वकाही दूर करेल. तुम्ही हा उपाय जरूर करा, मी आजपर्यंत हा घरगुती उपाय करणार्‍यांना मरताना पाहिले नाही. हा उपाय नाक, कान, घसा आणि हृदयासाठी रामबाण आहे. बाकी तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण हे एकदा आवश्य करा.

जाणून घ्या नाकात लिंबूरस टाकण्याचे सत्य

माहिती आणि प्रसारण कार्यालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक टीमने याची पूर्ण पडताळणी आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केली आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने म्हटले की, व्हिडिओत केलेला दावा खोटा आहे. यास कोणताही शास्त्रीय आधार नाही.