‘…नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार’ : उदयनराजे भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सध्या मराठा आरक्षणाच्या मद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी यात उडी घेतली आहे. मी राजकारण करत नाही परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना उदयनराजेंनी मांडली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.

‘…नाहीतर राजकारणाला रामराम करणार’

उदयनराजे भोसले म्हणाले, “सर्व समाजाबद्दल मला आदर आहे. प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. न्यायालयानंही सर्वांना समान अधिकार द्यावते. जर न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारनं काही केलं तर ठिक नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार हे मी मनापासून सांगतोय.”

‘वेळ आली तर राजीनामा देईन’

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, “मी कधीही राजकारण केलं नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन. पदावर राहून आपण काही करू शकत नसलो तर त्याचा काय उपयोग वेळ आली तर राजीनामा देईन” असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

‘राजेशाही असती तर दाखवलं असतं’

उदयनराजे म्हणाले, “सध्या लोकशाही आहे. राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकंच माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याचं भान ठेवायला हवं. प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा मग दाखवतो काय करायचं अन् काय नाही.” असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं.