पावसाळ्यापूर्वी वाहेगाव येथील गुई नदीवरील पूलाच्या भरावाचे काम होणार का ?

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –    राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला-लासलगाव मतदार संघात येत असलेल्या निफाड तालुक्यातील वाहेगाव आणि भरवस फाटा या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा भराव गेल्या पावसाळ्यात गुई नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे मात्र पाठपुरावा केल्यानंतरही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न उपस्थित करत या पावसाळ्यापूर्वी मोठे भगदड पडलेल्या ह्या गुई नदीवरील पुलाचा भराव दुरुस्त करत वाहन चालकांना दिलासा देणार का असा सवाल वाहेगाव येथील नागरिक व वाहनचालक करत आहे.

गेल्या पावसाळ्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या मोठ्या पावसामुळे शिव आणि गुई नद्यांना पूर आले होते या दोन्ही नद्यांचे संगम मरळगोई येथे होत असल्याने पुराचे पाणी एकत्र झाल्यामुळे वाहेगाव येथून जात असलेल्या गुई नदीवरील बंधाऱ्याला लागत असलेले वाहेगाव आणि भरवस फाटा या दोन गावांना जोडणारे पूल आहे या पूलाचे वाहेगाव बाजूचे भराव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने आज सात ते आठ महिन्यानंतरही मोठे भगदड तसेच असल्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून या मोठ्या भगदडमुळे छोटे-मोठे अपघातही होत असल्याने याबाबत निफाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतरही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रश्न नागरिक उपस्थित करत पावसाळ्यापूर्वी मोठे भगदड असलेल्या भरावाचे काम पूर्ण करत नागरिकांना व वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

7 जून रोजी राज्यात पावसाला सुरुवात होते त्यामुळे या गुई नदीवरील पुलाच्या भरावाचे काम पूर्ण करण्यासाठी आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष देण्याची मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक सुरेश तिपायले यांनी केली.