Lockdown वाढवण्यावर होणार शिक्कामोर्तब? ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारनंतर निर्णय

मुंबई : कोरोनाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र अजून अपेक्षित अशी परिस्थिती तयार झाली नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आज मंत्रालयात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

देशातील कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार यासह इतर राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात बाधितांची आकडेवारी कमी होत असली तरी ती ५० हजाराच्या आसपास आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात विशेष म्हणजे विशेष म्हणजे, मुंबई, पुणे,नागपूर,अमरावती, औरंगाबाद आणि सोलापूर या ठिकाणी गत महिन्याच्या तुलनेत आकडेवारी कमी दिसत असली तरी ग्रामीण भागाचा आलेख वाढता आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी करणे हे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. लॉकडाऊनमुळे शहरी भागात बाधितांची संख्या काम होत असली तरी ग्रामीण भागात संख्या वाढत आहे त्यामुळे ३० मे पर्यंत महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण थाबवून उपलब्ध लस ही ४५ पक्ष अधिक असलेल्या नागरिकांच्या दुसर्या डोससाठी वापरावी यावरही निर्णय होणार आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार आहे.

महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी राज्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही. याबाबतचा निर्णय बिहार, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांनी यापूर्वीच घेतला आहे. पण महाराष्ट्रात का होत नाही, यावरून देखील अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. यावरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.