‘या’ दिग्गज महिला नेत्यांची मंत्रीमंडळात ‘वर्णी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या खऱ्या परंतू अपुरे संख्याबळ असल्याने आणि बहुमत कोणत्याही पक्षाला नसल्याने राज्यात अजूनही सत्तास्थानेचा घोळ सुरु आहे. परंतू भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच या तिन्ही पक्षात सुत जुळू लागल्याने राज्यात महाशिवआघाडी सत्तास्थापन करेल अशी शक्यता वाढली आहे. त्यापाठोपाठ चर्चा सुरु झाली ती मंत्रिमंडळाची.

मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना संधी मिळणार या नावावर चर्चा रंगू लागली आहे. सत्तावाटपात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 14 मंत्रिपदे मिळू शकतात अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात महिला नेत्यांना देखील संधी मिळणार यात काही शंका नाही. यानुसार राष्ट्रवादीतून रुपाली चाकणकर, शिवसेनेतून निलम गोऱ्हे तर काँग्रेसकडून यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीला चित्रा वाघ यांनी रामराम ठोकला आणि कमळ हातात घेतले. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष पद होते. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यानंतर राष्ट्रवादीने ही जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपावली. चाकणकर यांनी पुण्यात अनेक आंदोलने केली आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मजबूत करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. विधानसभेला राज्यात त्यांनी चांगला प्रचार केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्या मंत्रिपदासाठी दावेदार आहेत.

काँग्रेसमध्ये यशोमती ठाकूर यांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला मात्र या दरम्यान देखील यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचा हात सोडला नाही. विधानसभेत काँग्रेसला चांगल्या जागा मिळवून दाखवत त्यांनी राज्यात आपले वजन वाढवले आहे.

तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची महिला आघाडी कायमच भक्कम ठेवली आहे. महिलांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी स्वत: लक्ष घातले आहे. या प्रश्नी त्या कायमच सक्रिय दिसल्या. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून बढती मिळणार अशी चर्चा आहे. सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेच्या उपसभापती पदाची जबाबदारी आहे.

Visit : Policenama.com