लीक झालेल्या चॅटप्रकरणी संजय राऊतांचा सवाल, म्हणाले – ‘आता कोर्ट मार्शल होणार का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालाकोटबद्दल यापूर्वीच माहिती असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल करणार का, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षा, लष्कराची गुपिते, महत्वाची माहिती अशा प्रकारे बाहेर येत असेल, तर तो राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे. आपण जणू काही राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार आहोत, या थाटात हे चॅट समोर आले. याप्रकरणी देशाचे संरक्षणमंत्री, देशाचे गृहमंत्री यांनी आपली भूमिका मांडायला हवी. तसेच, राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली, तर महाराष्ट्राच्या अन देशाच्या ज्ञानामध्ये भर पडेल.”

“देशाच्या अंतर्गत सुरक्षेला हा धोका आहे. जर सैन्यातील एखाद्या जवानाकडे महत्वाचा कागद जरी सापडला तरी त्याचे कोर्ट मार्शल होते. पण, येथे तर पुलवामा आणि बालाकोटबद्दल अगोदरच माहिती होती. यावरुन, राष्ट्रीय सुरक्षेला छेद असल्याचे समोर आलंय. त्यामुळे देशाचे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल करणार,” अशी विचारणा राऊत यांनी केली.

दरम्यान, पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. पण, दोन-तीन दिवस आधीच काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना दिल्याचे चॅटमधून समोर आले.