राष्ट्रवादीमध्ये असताना न जुळलेलं ‘या’ 3 राजांचं ‘सुत’ भाजपमध्ये जुळणार का ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर या तीन राजांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले शिवेंद्रसिंहराजे व त्या तयारीत असलेले रामराजे नाईक-निंबाळकर आणि आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा चालू आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत असताना या तीनही राजांचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे आता राष्ट्रवादीत न जुळलेले या तिघांचे सूत भाजपमध्ये जुळणार का, असा प्रश्‍न जिल्हावासीयांना पडला आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. रामराजेही त्याच वाटेवर असल्याच्या चर्चा चालू आहेत. उदयनराजे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूरगस्तांच्या प्रश्‍नासाठी भेट घेतली. यावरून उदयन राजेही भाजपात जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनांमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. उदयनराजेंना कंटाळून भाजपात गेलेले शिवेंद्रसिंहराजे व त्या तयारीत असलेले रामराजे नाईक-निंबाळकर यांची उदयनराजेंमुळे पुन्हा एकदा राजकीय अडचण होणार का? असा प्रश्‍न जिल्हावासीयांना पडला आहे.

उदयनराजेंवर दाखल झालेले खंडणीप्रकरण व सातारा पालिका निवडणुकीनंतर या तीनही राजांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला होता. त्यांनी एकमेकांवर अत्यंत टोकाचे आरोप केले होते. उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले गेले होते. अखेर पवारांनी यांच्यामध्ये मध्यस्थी करत समेट घडवून आणल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीत असताना या तीनही राजांचे एकमेकांशी सूत जुळत नव्हते त्यात भाजपात प्रवेश केल्याने काही फरक पडणार का ? की मागचाच कित्ता पुढे गिरवला जाणार असा प्रश्न पडला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –