महाराष्ट्रातील किल्ल्यात ‘तलवारी’ ऐवजी ‘छमछम’ आणणार का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का ? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे . नगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही सरसकट कर्जमाफी करु. यासाठी तुम्ही भाजपला चले जाव म्हणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘आज अनेक खासगी कारखाने बंद पडत आहेत. यामुळे अनेकांच्या नोक-या जात आहेत. यंदा ऊसच नसल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार नाहीत. जिल्हा आर्थिक संकटात आहे. शेतक-यांचे रोज वाटोळे सुरू आहे. भाजप कारखानदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतक-यांचे कर्जमाफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात.

शेतक-यांनी यांचे काय घोडे मारले ? त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करीत आहेत. भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का ?’ असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे एक एक करून मोठे नेते पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पक्ष प्रचारासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.

Visit – policenama.com