शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न, म्हणाले – ‘तिच्यासोबत लग्न करणार का ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन (MSEPC) कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या मोहिम सुभाष चव्हाण याच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. त्याच्यावर एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने आरोपीला तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली. याचिकाकर्त्याकडून आपण आपली सरकारी नोकरी गमावू शकतो असे सांगण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं सुनावणीमध्ये
मोहिम सुभाष चव्हाण याने कोर्टात सांगितले कि यामुळे मी माझी सरकारी नोकरी गमावू शकतो. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्याला विचारले कि, “जर तू लग्न करणार असशील तर आम्ही मदत करु शकतो. जर नाही, तर तुझी नोकरी जाईल आणि तुला जेमलध्ये जावं लागेल. मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी याचा विचार करायला हवा होता”.

तसेच सरन्यायाधीशांनी आरोपीला ‘तू तिच्यासोबत लग्न करणार का?’ अशी विचारणा केली असता आरोपीच्या वकिलाने “यासंबंधी सूचना घेऊ” असं उत्तर दिलं. यावर सरन्यायाधीश म्हणाले कि, “याचा विचार मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी व्हायला हवा होता. तू सरकारी कर्मचारी आहेस हे तुला माहिती होतं”.

सरन्यायाधीश पुढे हे सुद्धा म्हणाले, “आम्ही तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही आहोत. पण जर करण्याची तयारी असेल तर आम्हाला कळवावं. नाही तर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत आहोत असं सांगशील”.

यावर आरोपीच्या वकिलाने आपण यासंबंधी चर्चा करुन निर्णय कळवू असे सांगितले. त्यानंतर आरोपीने सांगितले कि, “मला आधी लग्न करण्याची इच्छा होती. पण तिने नकार दिला. आता मी विवाहित असल्याने लग्न करु शकत नाही”. तसेच यावर अजून खटला सुरु आहे आणि अजूनही माझ्यावरचे आरोप सिद्ध नाही झाले आहेत. “मी सरकारी कर्मचारी असून जर अटक झाली तर आपोआप निलंबित होईन,” असेसुद्धा आरोपीने कोर्टात सांगितले आहे.

त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले, “म्हणूनच आम्ही तुला हा पर्याय दिला आहे. आम्ही चार आठवड्यांसाठी अटक स्थगित करत आहोत. नंतर तू नियमित जामीनासाठी अर्ज करु शकतोस,” याअगोदर ट्रायल कोर्टाकडून आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाकडून मात्र ते फेटाळण्यात आले.