भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. दरम्यान राज्यातील कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता संपल्याने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करा, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहेत. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे, त्यात म्हटले आहे की, अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली. तसेच कोरोनामुळे राज्यातील कारागृहातील कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा. तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या असल्याचे शेलारांनी म्हटले आहे. कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.