सत्ताबदलाचं वारं सुरु झालंय, ते कदापी थांबणार नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना सोयीस्करपणे दुर्लक्षीत केले. रोजगार निर्मितीमध्ये सरकार अयशस्वी झाल्याने कोट्यावधी युवकांची फसवणूक झाली आहे. निवडणुका जवळ येतील तसे भाजपकडून नवीन जाहीरनामे बाहेर येतील. पण देश व राज्यातील जनता मागील निवडणुकातील भाजपच्या जाहीरनाम्याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाच राज्यातील निकालावरून सत्ताबदलाचे सुरू झालेले वारे आता थांबणार नसल्याचे वातावरण देशभर दिसत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

टाळगाव, ता. कराड येथे आ. आनंदराव पाटील यांच्या आमदार आदर्श ग्राम योजनेतील विविध कार्यक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पो.नि. अशोक क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, अजित पालकर, पोपटशेठ पाटील, अजितराव चिखलीकर, पै. नानासाहेब पाटील, बंडानाना जगताप, इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, पं.स.सदस्य उत्तमराव पाटील, सदस्या वैशाली वाघमारे, रामचंद्र भजनावळे, पै. तानाजी चवरे, उदय पाटील-उंडाळकर, विद्याताई थोरवडे, उमेश साळुंखे, सरपंच मारुती सुतार, संयोजक आण्णासाहेब जाधव, बापूराव काटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षात लोकहिताचे कोणतेही काम केलेले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी निधी उपलब्ध नसताना भाजपकडून मोठमोठया घोषणा होण्याची शक्यता आहे. बेरोजगारी व शेतीचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. राज्यात दुष्काळ भेडसावत आहे. मी मुख्यमंत्री असताना पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हाताळून १0 लाख जनावरे छावण्यांमध्ये सांभाळली. पण या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या राज्यात १७ लाख टन चाऱ्याची टंचाई आहे. चारा आयात केला तरी पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, रामचंद्र भजनावळे, तानाजी चवरे, विद्याताई थोरवडे यांची भाषणे झाली. यावेळी ग्रामपंचायतीस घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. आण्णासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब जाधव, विनोद पाटील, बाजीराव देसाई, प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. धनाजी देशमुख यांनी आभार मानले.