…म्हणून अभिनंदन यांना परतण्यास विलंब लागला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानकडून काल (शुक्रवार दि 1 मार्च)  सुटका करण्यात आली. दुपारपासूनच वाघा बाॅर्डरवर देशभक्त आणि मीडिया दाखल झाले होते. परंतु त्यांच्या घरवापसीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. रात्री 9 नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. परंतु त्यांना परतण्यास एवढा वेळ का लागला हा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडला होता. याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आपल्या चांंगुलपणाचा प्रचार होण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना चांगली वागणूक कशी दिली याचा व्हिडीओ बनवण्यात पाकने वेळ घालवला. वाघा बॉर्डरवर सोडण्यापूर्वी अभिनंदन यांना आयएसआयच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी अनेक तास बसवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिनंदन यांना संध्याकाळी लाहोर येथे आणण्यात आले. यानंतर त्यांना आयएसआयच्या कार्यालयात नेण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकचे लष्करी अधिकारी आणि इतर शासकीय अधिकारी यांनी आपल्याला कशा प्रकारे चांगली वागणूक दिली हे सांगण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्याचा व्हिडीओ  बनवला गेला. यानंतर त्यांना हवा तसा एडिट करून तो पसरवण्यात आला. व्हिडीओ वरून तसं स्पष्ट दिसूनही येते. अभिनंदन यांनी व्हिडीओत जे सांगितले तेच त्यांनी लिखित स्वरूपात द्यावे अशा सूचनाही त्यांना दिल्या गेल्या. अभिनंदन यांना भारतात येण्यासाठी यामुळेच विलंब लागला असल्याचेही भारतातील लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान युद्धकैदी असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना आपण सन्मानपूर्वक वागणूक दिली आहे असे पाकने म्हटले आहे. युद्धकैद्यांबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतच त्यांच्याशी व्यावहार करण्यात आल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे.

परंतु अभिनंदन यांना भारतात येण्यास उशीर होण्यामागचे कारण सांगताना, पाकिस्तानमधील हवाई मार्ग बंद असल्याचे कारण पाकने सांगतिले आहे. अभिनंदन यांनी गाजावाजा करत सार्वजनिकरित्या भारतात प्रवेश करावा हेच पाकिस्तानला हवे होते. अभिनंदन यांनी विशेष विमानाने भारतात यावे यासाठी भारताने प्रयत्न केले. अभिनंदन यांना सन्मानपूर्वक घेण्यासाठी काही भारतीय अधिकारी पाकिस्तानात पाठवण्याचीही तयारी करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांची यादीही भारताने पाकिस्तानला दिली होती. परंतु भारताची ही विनंतीही पाकने धुडकावली होती. दरम्यान या अधिकाऱ्यांमध्ये एक एअर मार्शल आणि दोन विंग कमांडर यांचा समावेश होता.