मुलीला डोळा मारणे, फ्लाईंग KISS करणेही लैंगिक छळ; न्यायालयानं सुनावली 1 वर्षाची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीला डोळा मारणे आणि फ्लाईंग किस केल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबईतील एका 20 वर्षाच्या तरुणाला न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा लैंगिक इशारा आहे. त्यामुळे पीडित तरूणीचा लैंगिक छळ झाला आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.

याबाबतची माहिती अशी की, 29 फेब्रुवारी 2020 रोजी 14 वर्षाच्या मुलीने तिच्या आईला सांगितले की, एका मुलाने तिला डोळा मारला तसेच फ्लाईंग किस केली. यावरून पीडित मुलीच्या घरच्यांनी एलटी मार्ग पोलीसात लैंगिक छळाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तरूणाविरोधात तक्रार नोंदवून  त्याला अटक केले तेंव्हापासून हा तरुण कोठडीत आहे. तरूणाने कोर्टात म्हटले आहे की, मुलीच्या आईने मी वेगळ्या जातीचा असल्याने मुलीशी बोलण्यापासून रोखले होते.

तसेच तिच्या नातेवाईकांमध्ये तिने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याबाबत चॅलेंज केले होते, असे त्याने सांगितले. सुनावणीवेळी मुलगी, तिची आई आणि तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध झाला. साक्षीदारांच्या जबाबानंतर तरूण दोषी आढळला. त्यावेळी कोर्टाने सांगितले की, आरोपीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याला 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.