विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत, 14 डिसेंबरपासून दोन दिवस चालणार कामकाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपते घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दि. 14 आणि 15 डिसेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. तसेच हे अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.

बुधवारी (दि. 3) झालेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय झाला. त्यानुसार यावेळचे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच होणार असून, ते 14 आणि 15 डिसेंबरला होईल. दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे वर्षभरात तिसऱ्या अधिवेशनाला थोडक्यात आटोपावे लागत आहे. मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर आटोपावे लागले होते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पावसाळी अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले होते. अखेरीस सप्टेंबरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपावे लागले होते.