WISDEN नं निवडला भारताचा सर्वोत्तम संघ, MS धोनीला ‘डच्चू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर भारताचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासह भारतीय संघ तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ सहा कसोटी सामने खेळणार आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी विस्डेनने आयसीसीच्या रँकिंगनुसार सर्वोत्तम भारताच्या कसोटी संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे या संघाचे नेतृत्व विराट कोहली याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सलामीवीर म्हणून विस्डेनने महान खेळाडू सुनील गावस्कर आणि कसोटी तज्ज्ञ राहुल द्रविडची निवड केली आहे. संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला स्थान मिळू शकले नाही. संघाची मधली फळी पाहिली तर विस्डेनने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी चेतेश्वर पुजारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. कर्णधार विराट कोहलीचा पाचवा क्रमांक लागतो.

धोनी कसोटी संघाबाहेर

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही या संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला न निवडता ऋषभ पंतची यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या चांगल्या कामगिरीनंतर पंतला संघात स्थान मिळाले आहे. माजी कर्णधार कपील देव यांना सातव्या क्रमांकासाठी जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये निवडले गेले आहे. विस्डेनने या संघात तीन फिरकीपटूंची निवड केली आहे. यामध्ये अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांचा समावेश आहे. इतर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचा देखील समावेश आहे.

भारतीय कसोटी संघ

सुनील गावस्कर, राहुल द्रवीड, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कपिल देव, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह