COVID-19 : दिवसभरात ‘कोरोना’चे 505 नवीन रूग्ण, देशाचा आकडा 3588 पार, आतापर्यंत 83 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं देशात सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आज (रविवार) दिवसभरात 505 नवीन रूग्णांची वाढ झाली असून आता देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3577 वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत देशात तब्बल 83 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आज दिवसभरात 113 नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्णांची संख्या 748 वर जाऊन पोहचली आहे.

कोरोना व्हायरस संबंधित दिवसभरातील घडामोडी

1. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे 4 नवे रूग्ण आढळले असून एकुण संख्या 26 वर पोहचली आहे. 4 रूग्णांवर उपचार करून त्यांना रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील यांच्याशी कोरोनाबाबत चर्चा केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी दैवेगौडा यांच्याशी देखील मोदींची बातचीत झाली आहे. कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीला कशापध्दतीनं हाताळावं यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांबरोबर देखील चर्चा केली. त्यामध्ये प्रामुख्याने सोनिया गांधी, मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव, एमके स्टॅलीन, प्रकाश सिंह बादल आणि मायावती यांचा समावेश आहे.

4. पंजाबमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 68 वर गेला असून आज 3 नवीन रूग्ण आढळुन आले आहेत. त्यामध्ये लुघियाना, बर्नाला आणि एसएएस नगरचा समावेश आहे. लुघियानामध्ये आढळून आलेल्या रूग्णाने दिल्लीमधील निझामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या मकरज कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

5. हवेमधून कोरोना पसरत असल्याचा एकही पुरावा नसल्याचे इंडियन मेडिकल (आयसीएमआर) या संस्थेने स्पष्ट केले आहे.

6. जम्मू-काश्मीरमधील कोरोनाबाधितांची संख्या आता 106 वर जाऊन पोहचली आहे.

7. बिहारमध्ये मास्क आणि इतर उपकरणांचा तुटवडा असल्याचे राज्याचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितले आहे.

8. मध्यप्रदेशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 122 वर जाऊन पोहचला आहे. आज 9 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.

9. राजस्थानमध्ये 47 नवीन रूग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 253 वर जाऊन पोहचली आहे.

10. केरळमध्ये कोरोनाचे 8 नवीन रूग्ण आढळून आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.