महालक्ष्मी लॉन्समध्ये सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यासाठी संभाजी ब्रिगेडसह मनसे, युवासेना आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विमाननगर येथील खांदवे नगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये सुरु असलेला संगीत कार्यक्रमाला विरोध करत संभाजी ब्रिगेड, मनसे आणि युवा सेना यांनी पोलिसांना निवेदन देऊन कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस, कार्यक्रमाचे संयोजक आणि संघटना व पक्षांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

महालक्ष्मी लॉन्समध्ये सुरु असलेल्या संगीत कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, मनसे, युवा सेना या पक्षांचे कार्यकर्ते आज दुपारी तेथे जमा झाले होते. हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे संयोजक आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावऱण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी पोलीसांना कार्यक्रम बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे काही काळ वाहतुक कोंडीही झाली. परंतु पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवून वाहतुक सुरळीत केली.

काही काळ कार्यक्रम बंद करण्य़ात आला होता

देशावर एवढा मोठा दहशतवादी हल्ला झालेला असताना दारू पिऊन सुरु असलेल्या नाचगाण्यांच्या कार्यक्रमांमुळे पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासला जात आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की. देशावर एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. त्या हल्ल्याचा निषेध आणि त्याचं दु:ख पुणेकर व्यक्त करत आहेत. आणि महालक्ष्मी ल़ॉन्समध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा नंगा नाच सुरु आहे. देशाचं रक्षण करताना शहिद झालेल्या जवानांचं यांना काहीच पडलेलं नाही. त्यामुळे असे कार्यक्रम आम्ही चालू देणार नाही.