मूठभर बिल्डरांचं ‘चांगभलं’ करणारा प्रस्ताव मागे घ्या, फडणवीस यांची CM ठाकरे यांच्याकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊननंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खासगी लोकांचे चांगभलं करण्याचे काम केले जात आहे. यामुळे हजारो कोटींचे नुकसान होणार असून राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोना संकटानंतर मगरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रीमियममध्ये 50 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासंदर्भात काय उपाय करता येतील याबाबतीत दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्य सरकारला काही शिफारशी केल्या होत्या. मात्र, यातील निवडक आणि सोयीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे काही निवडक लोकांचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसणार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुद्रांक शुल्कातील सवलत, रेडीरेकनर दर आणि प्रीमियम या काही आवश्यक बाबी आहेत. परंतु, सरकारच्या निर्णयामुळे केवळ मूठभर लोकांनाच लाभ होणार नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.

कार्यवाही न झाल्यास न्यायालयात धाव
मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा हा गुप्त असतो तरी हा अजेंडा, त्याची कागदपत्रे, निर्णयाचा मसुदा हे सर्व विकासकांपर्यंत पोहोचले आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत असताना तिजोरीची अशी उघड लूट होणार नाही, हीच अपेक्षा आहे. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.