चीनकडून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपूर्णच !

पोलिसनामा ऑनलाईन – पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. मात्र सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली असल्याचेही सांगितले आहे. भारत आणि चीनने सीमेवरील बहुसंख्य ठिकाणांहून आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचा दावा चीनच्या राजदूतांनी केला होता. त्यानंतर भारताने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली आहे, मात्र सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले होते. सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत या बाबत भारत आणि चीनचे लष्करी कमांडर नजीकच्या भविष्यात चर्चा करणार आहेत, असेही प्रवक्त्याने सांगितले. भारत व चीन यांच्यातील तणाव लवकर कमी होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे, हिमालय भागातील चीन सीमेवर भारत अतिरिक्त 35 हजार सैनिक तैनात करण्याची तयारी करत आहे. ही तैनात करण्यात आल्यास 3 हजार 488 किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सध्याची स्थिती बदलणार आहे. पूर्व लडाखमध्ये 15 जूनच्या रात्री झालेल्या संघर्षांत 20 भारतीय सैनिक आणि काही चिनी सैनिक ठार झाले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी या भागात हजारो सैनिक, तोफा आणि रणगाडे तैनात केले. भारत व चीन यांच्यातील सीमा समझोते उपयोगाचे ठरत नसल्यामुळे अशा परिस्थितीत अतिरिक्त फौजा तैनात करणे आवश्यक झाले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.