‘..तर १० दिवसांत ओडिसामध्ये कर्जमाफी’ : राहुल गांधी 

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज विमानानं भुवनेश्वरला पोहोचले. आज ते ओडिसाच्या दौऱ्यावर आहेत. याचसाठी ते भुवनेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी तेथील जनतेशी त्यांनी संवाद साधला.ओडिसामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास फक्त १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. याशिवाय त्यांनी  यावेळी ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाही चढवला.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “निवडणुकीसाठी फक्त दोन ते तीन महिने उरले आहेत. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकून घ्या, काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास तुम्ही फक्त १० पर्यंत मोजा ११ ची पण गरज नाही, फक्त १० दिवसांमध्ये ओडिशामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल.”
यावेळी त्यांनी मोदींवर निशाणाही साधला. राहुल यांनी पुन्हा एकदा  चौकीदार चोर असल्याचा घणाघात केल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर, ओडिसामध्ये चोरी होत आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. याशिवाय तेथील मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी सडकून टीका केली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या चिट फंड घोटाळ्यामुळे त्यांचा रिमोट हिंदुस्थानच्या भ्रष्ट चौकीदाराच्या हातात गेला आहे. त्यामुळे चौकीदारांनी बटण दाबला की नवीन पटनाईक उठतात आणि बसतात अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.