Coronavirus : ‘मास्क’ शिवाय मंत्रालयात ‘एन्ट्री’ नाही !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यावर काम करीत आहे. जनजागृती, भिंतीपत्रके, सोशल मीडियावर कोरोनासंदर्भात माहिती दिली जात आहे. असे असतानाही काही नागरिकांकडून सरकाराचे आवाहन गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता मंत्रालयात मास्कशिवाय बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी केली होती. त्यानुसार महत्त्वाचे काम असलेल्यांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र, त्यात आणखी एक निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि भेटीसाठी येणार्‍यांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्कशिवाय येणार्‍यांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण मंत्रालयात जाणे टाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.