महाबळेश्‍वरमध्ये विनापरवाना शुटिंग ; कोटीची मालमत्ता जप्त

महाबळेश्‍वर : पोलीसनामा ऑनलाईन – महाबळेश्‍वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे शुटिंग रात्रीच्या वेळी विनापरवाना करत असताना आढळून आल्याने वनविभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी निर्माते अमीन सलीम हाजी (वय ४८, रा.पाचगणी) यांच्यावर वन विभागाच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अमिन सलिम हाजी हे आपल्या आगामी ‘कोई जाने ना’ या चित्रपटाचे शुटिंग रात्रीच्या वेळी विनापरवाना वेण्णालेक परिसरात करीत असताना आढळुन आल्याने वन क्षेत्रपाल रणजित गायकवाड यांच्या पथकाने धडक कारवाई करत १२ वाहनांसह सुमारे १ कोटींपेक्षा अधिक रक्कमेची मालमत्ता जप्त केली आहे.

महाबळेश्‍वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. रहस्यमय कथा असल्याने चित्रपटामध्ये रात्री जंगलामधील काही दृश्ये आहेत. ही दृश्ये चित्रित करण्यासाठी वन विभागाची परवानगी न घेता वनक्षेत्रात रात्री साडेआठ वाजता चित्रपटाच्या युनिटने वेण्णालेक पेटीट रोड दरम्यान चित्रीकरण सुरू केले. रात्री दहाच्या दरम्यान ही माहिती वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांना मिळाली. वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक सहदेव भिसे, लहू राऊत, रमेश गडदे, ज्योती घागरे, संगीता देसाई व विद्या घागरे या सहकार्‍यांना बरोबर घेवून ते जंगलात गेले असता तेथे चित्रपटाचे शुटिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने चित्रपटाचे शुटिंग बंद पाडले व चित्रपटाच्या शुटींगसाठी वापरण्यात आलेल्या कार, टेम्पो व अशी १२ वाहने, कॅमेरा असे एक कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे साहित्य जप्त केले. महाबळेश्‍वर वन विभागाने अमिन सलिम हाजी यांच्यावर भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. वनपाल एस. के. नाईक पुढील तपास करत आहेत.

म्हणून रात्रीच्या शुटिंगसाठी वनक्षेत्रात परवानगी नाही-

महाबळेश्वरच्या जंगलात चित्रपटाच्या शुटिंगसाठी परवानगी सुर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत असते. महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात वन्य प्राण्यांची संख्या मोठय़ा संख्येने वाढली आहे. त्यामुळे रात्रीचा जंगलातील वावरावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या ठिकाणी चित्रपटाचे शुटिंग सुरू होते त्या भागात गव्यांचे कळप फिरतात. हे गव्यांचे कळप जर बिथरले तर ते माणसावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या शुटिंगसाठी वनक्षेत्रात परवानगी दिली जात नाही, अशी माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी दिली.