दोन वाहनांच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू तर दोनजण जखमी

निपाणी : पोलीसनामा ऑनलाईन

कंटेनरचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील ताबा सुटून कंटनेर दुभाजकावरून पलीकडच्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी भाजीपाला घेऊन जाणा-या बोलेरो कंटेनरची धडक बसली. या विचित्र अपघातात कंटेनर चालकासह बोलेरोमधील तीघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-बेंगळुरु महामार्गावर सोमवारी (दि.२५) सकाळी आठच्या सुमारास निपाणी येथील महात्मा गांधी हॉस्पिटलसमोर घडला. मृतांपैकी दोघे कोल्हापूरचे रहिवासी आहेत.

कंटेनर चालक रमेशसह (वय ४०, रा. कळगेडे, जि. राणेबेन्नूर), बोलेरोमधील शब्बीर सय्यद (वय २८, रा. कळंबा-कोल्हापूर), राजमहमद बागवान (वय ३७, बागवानगल्ली-निपाणी) व नदीम बागवान (वय ३१, रा. दांडगेवाडी-कोल्हापूर) हे चौघे जागीच ठार झाले. तर कंटेनरचा क्‍लिनर आनंद लमाणी व फय्युम बागवान  हे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी फय्युम बागवानची प्रकृती चिंताजनक आहे.

[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’af54e7b7-786f-11e8-b4f8-9da9a7980c74′]

अपघातानंतर एकमेकात अडकलेली दोन्ही वाहने क्रेन व पुंजलॉईडच्या भरारी पथकाने बाजूला केली. तर कंटेनर चालक रमेशचा अडकलेला मृतदेहही अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

हा अपघात घडण्यापूर्वी कंटेनरच्या मागे असलेली इचलकरंजी-होसपेट बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. पण कंटेनर भरकटल्याचे पाहून प्रसंगावधान राखत बसचालकाने वेग कमी केला. तरीही कंटेनरची बुलेरोला धडक बसल्यानंतर त्यातील भाजीपाला बसमध्ये फेकला गेला. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.