मुंबई : Wockhardt हॉस्पीटलमधील काही कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण, रूग्णालय ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबईत कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ४५८ वर पोहचली आहे. मुंबईमधील वॉकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालय सील करण्यात आलं असून, महापालिकेतर्फे वॉकहॉर्ट रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या परिसरात नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल या परिसरामध्ये वॉकहार्ट रुग्णालय असून, रुग्णालयात काम करणाऱ्या २६ नर्स आणि ३ डॉक्टरांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर रुग्णालयातील २७० नर्स आणि काही रुग्णांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्या नर्स आणि डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वाना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला छातीत काही त्रास होत होता. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संसर्गाने या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे मुंबईतील प्रचलित रुग्णालये सील करण्यात आली आहे. त्यात, सैफी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, आणि भाभा हॉस्पिटल मधील सेवाही काही अंशी बंद करण्यात आली आहे. तर राज्यात एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ७४८ वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण ४५८ मुंबईतील आहे. तर कोरोना संसर्गित मृत रुग्णांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. यातील सर्वाधिक ३० मुंबईतील असून, सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

You might also like