Nashik News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी

सटाणा : पोलीसनामा ऑनलाईन –  लग्न समारंभ आटपून घराकडे निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. सटाणा शहरातून जाणा-या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे साळमुख वाडीचौल्हेर गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पळून जाणा-या कंटेनरचालकास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

कल्पना अजय बोरसे (वय 22) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अजय बोरसे असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुकडनाला परिसरात बुधवारी असलेला विवाह समारंभ आटोपून अजय बोरसे पत्नी कल्पना बोरसे यांच्यासह दुचाकीने जात होते. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर (कै.) पं. ध. पाटीलनगरमधील वळण रस्त्याकडे जात होते. त्यावेळी नाशिककडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली.

त्यामुळे दुचाकी महामार्गावर जोरात पडली आणि काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या कल्पना बोरसे कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्या. त्यात त्या जागीच ठार झाल्या. त्यांचे पती अजय बोरसे यांच्या पायास दुखापत झाली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपघातामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहर वळण रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.