‘ड्राय डे’ दिवशी देशी दारू विक्री करणाऱ्या महिलेला बेड्या, पावणे दोन लाखांची देशी दारू जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या निकालादिवशी चोरून देशी दारू विकणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी देशी दारू, बिअर असा १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

निर्मला नरेश मिनेकर (वय ४८, रा. भाटवस्ती, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या अनुषंगाने येरवडा पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान निकालामुळे दारू विक्री करण्यास मनाई कऱण्यात आली होती. ड्राय डे असतानाही काही महिलांनी देशी दारूचा साठा करून दारूची विक्री चढ्या दराने करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निर्मला मिनेकर हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये किंमतीची देशी दारू, बिअर जप्त करण्यात आली आहे.