पतीकडून पैसे उकळण्यासाठी पोटच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव, महिलेसह साथीदारांना बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पतीने दुसरे लग्न केल्याने त्याच्याकडून १५ लाख रुपये आणि फ्लॅट मिळविण्यासाठी महिलेने पोटच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला. परंतु हडपसर पोलिसांनी तिचा हा डाव उधळत महिलेसह तिला मदत करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणीलाही बेड्या ठोकल्या आहेत.

संगीता चांगदेव जगताप (वय ३८, रा. शेवाळवाडी), मैत्रिण संगीता गणेश बारड (वय २९, रा. लोणी काळभोर, मित्र अभिजीत अशोक कड (वय. ३३, रा. कोरेगाव मुळ. ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या ४ वर्षाच्या आर्यन नावाच्या मुलाचे एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्यांनी अपहरण केल्याची तक्रार त्याची आई संगिता जगताप हिने केली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखळ करून याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी तपास अधिकारी संजय चव्हाण आणि इतरांनी गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून तिघांचा डाव उधळत बेड्या ठोकल्या.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. पतीने दुसरे लग्न केले अन इथेच बिनसले संगीता जगताप हिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. दरम्यान तिचे काही दिवसांपुर्वी पहिल्या पतीसोबत असतानाच तिचे चांगदेव जगतापशी सुत जुळले. आणि त्यानंतर पतीने निधन झाल्यावर तिने जगतापशी लग्न केले. जगतापपासून तिला आर्यन नावाचा मुलगा झाला. चांगदेव जगताप हा शिर्डी येथे सिड फॉर्मचा व्यवसाय करतो. तो आई वडीलांसोबत तेथे राहतो. महिन्यातून कधीतरी तो पुण्यात येतो. दरम्यान त्याने काही दिवसांपुर्वी तेथे दुसऱ्या एका महिलेशी लग्न केल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने त्याच्याकडे शिर्डी येथे जाऊन त्याचा जाब विचारला आणि त्याच्याकडे समझोता करण्यासाठी १५ लाख रुपये आणि एक फ्लॅटची मागणी केली. त्यानंतर जगतापने तिची मागणी फेटाळून लावली.

त्याने आणि त्याच्या आई वडीलांनी तिच्याकडे आर्यनचा ताबा मागितला. तिने त्यास नकार दिला. आणि मैत्रिण संगिता बारड आणि मित्र अभिजीत कड याच्याशी संपर्क साधून आर्यनच्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर २८ एप्रिल रोजी प्लानप्रमाणे आर्यनचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर तिने याची माहिती पतीलाही दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यावर अपहरण झालेल्या गाडीची माहिती मिळाली असे पोलिसांनी सांगितल्यावर तिने घाबरून जाऊन अभिजीत आणि संगीताला त्याला सोडून देण्यास सांगितले. मुलगा मिळाल्याची खात्री झाल्यावर दोघेही पसार झाले. परंतु पोलिसांनी तपास करून त्यांना अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार युसूफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंडे, अकबर शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे यांनी ही कामगिरी केली.