Coronavirus : पोलिसांनी तिला मास्क घालण्यास सांगितलं, महिलेनं केलं ‘असं’ काही

वसई : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या हाताचा चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला पोलिसांनी मास्क घालण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन एका श्रमिक महिलेने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी महिलेच्या विरोधात माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्यापर्यंत तिला अटक करण्यात आली नाही.

मंगळवारी रेल्वे प्रशासनातर्फे मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी सात ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे मजुरांमध्ये गडबड होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. यादरम्यान, पोलिस आणि मजुरांच्यात किरकोळ स्वरूपात बाचाबाचीच्या घटना घडल्या होत्या. वसईच्या सनसिटी मैदानात मजुरांसाठी टाकण्यात आलेल्या मंडपाजवळ माणिकपूर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई सुमन कांटेला यावेळी बंदोबस्तासाठी तैनात होत्या. त्यावेळी गायत्री रामचंद्र मिश्रा (वय३५) ही महिला आपल्या गावी जाण्यासाठी वैद्यकीय तपासणीकरता मास्क न लावता बसली होती. तेव्हा कांटेला यांनी गायत्रीला मास्क लावण्याबाबत हटकले असता. गायत्रीने रागाच्या भरात महिला पोलिस शिपाई यांच्या हाताला जोरदार चावा घेतला. यामध्ये सुमन यांच्या हातास किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे.

दरम्यान, माणिकपूर पोलिसांनी महिला पोलिसाच्या तक्रारीनंतर गायत्री हिच्यावरती कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केला असून, अद्याप तिला अटक करण्यात आली नसल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.