नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – नोकरी देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन एका २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना मोरादाबादला घडली असून याप्रकरणी पोलिसांनी राहा आणि इथेशाम या दोन जणांना अटक केली आहे.

दिल्लीतील मिठापूर परिसरात राहणारी पीडिता सोशल मीडियाच्या माध्यमातून एका आरोपीच्या संपर्कात आली होती. आरोपीने स्वतःला ऑनलाइन एक्सपोर्ट कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचं सांगितलं होतं.तसेच त्या तरुणीला त्याने नोकरी लावून देण्याची ऑफर दिली होती आणि कॉल करून शनिवारी दिल्लीहून मोरादाबादला मुलाखतीसाठी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर शनिवारी पीडित तरुणी मोरादाबादमध्ये पोहोचली. सोशल मीडियातून परिचय झालेल्या आरोपीला तरुणी भेटली.

यावेळी आरोपीसोबत आणखी एक व्यक्ती होती. दोघे तरुणीला मोरादाबाद बस स्थानकावर भेटले. त्यानंतर ते तरुणीला घेऊन बुद्ध विहार परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. तिथे आरोपींनी तरुणीला शीतपेयातून बेशुद्धीचं औषध दिलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. शुद्ध आल्यानंतर तरुणीला आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचं समजले. त्याचबरोबर दोन्ही आरोपीही फरार झाले होते.तरुणीने दोघांविषयी चौकशी केली. मात्र हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आरोपींविषयी कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर तिने आईवडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या.