पतीशी भांडण पडलं महागात, पत्नी घराबाहेर पडल्यावर ’कोरोना’च्या तावडीत !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशभरात अनेक विचित्र घटना उघडकीस येत आहेत. पतीशी भांडण करुन जालन्याहून गुजरातमध्ये जात असलेल्या एका महिलेला महागात पडले आहे. गुजरातमध्ये ती आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही घटना समजताच जिल्हा प्रशासनासह जालनेकरांमध्ये धडकी भरली आहे. गुजरात राज्यातील नर्मदा येथील पोलिस अधीक्षकांनी एका पत्राद्वारे जालना पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना ही माहिती कळवली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सदर कोरोनाग्रस्त महिलेची पती व तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.

संबंधित महिला जालना तालुक्यातील गुंडेवाडी गावात पतीसह राहत होती. हे दोघे दाम्पत्य गावातीलच एका कंपनीत काम करत होते.  पतीसोबत भांडण झाल्याने  महिला 10 एप्रिल रोजी गुजरातमधील देदीपाडा जिल्ह्यातील भुतबेडा गावी गेली होती. त्याठिकाणी तिचा स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. दरम्यान,15 एप्रिल रोजी तिचा वैद्यकीय अहवाल आला. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाले. तेथील जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जालना येथील जिल्हा पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांना पत्राद्वारे माहिती दिली. त्यानंतर एस.चैतन्य यांनी या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांना दिली.

पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यासह चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले आणि इतर सहकारी अधिकारी व कर्मचारी गुंडेवाडी येथे दाखल झाले. महिलेच्या पतीसह संपर्कात आलेल्या 14 जणांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात आला असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी घेण्याचे काम सुरु आहे.