नवीन वर्षाच्या आरंभी जुळ्या बाळांचा जन्म ; एकाच जन्म लोकल मध्ये तर एकाच स्टेशनवर 

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची आणि जराशी वेगळी वाटणारी बातमी हाती आली आहे. सफाळे देऊळपाडा या गावच्या रहिवाशी असणाऱ्या छाया सवरा या वीस वर्षीय महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. जन्माचे वैशिष्ठ म्हणजे या जुळ्या पैकी एका बाळाला या महिलेने विरार-डहाणू लोकलमध्ये तर दुसऱ्या बाळाला पालघर रेल्वे स्थानकावर जन्म दिला आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दुसरी प्रसूती हि रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षालयात जाऊन केली आहे. दोन्ही बाळे आणि त्यांची माता सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पालघर  रेल्वे स्थानकावर अशी घडलेली हि पहिलीच घटना आहे.

छाया यांना आज सकाळीच प्रसूती वेदना जाणवू लागल्याने त्यांच्या नवऱ्याने सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल केले होते. परंतु त्यांना तेथे प्रसूती करण्यास अडचण होत असल्याने  छाया यांना पालघरला घेऊन जाण्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. प्रसूतीच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या छाया यांना पती अंकुश आणि सासू कमली यांनी वेळ वाचवण्यासाठी लोकलने पालघरला घेऊन जाणे पसंत केले. त्यानंतर त्यांना रेल्वेत अशा अवघडलेल्या महिलेला घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक स्टेशन मास्तर कडून पालघरच्या स्टेशन मास्तरांना आधीच देण्यात आली होती. त्यांनी प्रसंगावधान राखून लोकल पालघर स्टेशनवर येण्या अगोदर तेथे पालघर ग्रामीणच्या डॉक्टरांना बोलावून घेतले. स्टेशन मास्तरच्या नेतृत्वात तेथील रेल्वे गार्ड सफाई कामगार सर्वच तयारीला लागले. सफाई कामगारांनी रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षालयाची सफाई करून घेतली. त्याच प्रमाणे पोलिसांनी लोकल थांबताच अडलेल्या महिलेला उचलून प्रतिक्षालयातदाखल केले.

प्रतिक्षालयात वीस मिनिटे थांबल्या नंतर त्या मातेने तेथेच दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. प्रसूती नंतर त्या मातेला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच रेल्वे स्टेशन वरील स्टेशन मास्तर आणि त्यांच्या टीमच्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे. तर डॉक्टरांनी तत्परता दाखवल्याने हि प्रसूती सुखरूप झाल्याचे छाया यांचे पती अंकुश यांनी म्हणले आहे. दोन्ही बाळे आणि माता सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.