दुर्देवी ! जुळ्या बाळाला जन्म दिलेल्या मातेचा अवघ्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू, पिंपरीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   अवघ्या 24 तासात जुळ्या मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवले आहे. सोमवारी जुळया बाळांना जन्म दिलेल्या मातेचा कोरोनामुळे मंगळवारी (दि. 6) मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालायत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान दोन्ही बाळांना जन्मानंतर ऑक्सिजनवर ठेवले होते. आता दोन्ही बाळ सुस्थितीत आहेत. तसेच त्यांची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे तर आरटीपीसीआरचा रिपोर्ट अद्याप प्रतिक्षेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिलेला रविवारी (दि. 4) त्रास जाणवू लागला होता. दरम्यान प्रसुतीची वेळ जवळ आल्याने तिला घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ऑक्सिजन लेव्हल खालावल्याने डॉक्टरांनी सुरूवातीला अ‍ॅन्टीजेन चाचणी करुन घेतली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 5 एप्रिलला सिझर ऑपरेशन केल्यानंतर महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. पण बाळांना कुशीत घेण्यापूर्वीच महिलेची प्रकृती खालावली आणि आज त्यांचा मृत्यू झाला.