ओढणी अडकली अन् ‘तिचा’ घात झाला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ऑफिसला जाताना मागून आलेल्या ट्रकच्या हुकमध्ये ओढणी अडकल्याने तरुणीला आपला जीव गमवावा लागला. नागपूर अमरावती महामार्गावर घडलेल्या या घटनेत ओढणी अडकल्यानंतर तरुणी मागच्या चाकाखाली आली आणि ट्रकने तिला चक्क ३० फुट फरफटत नेले. तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास वाडी परिसरात घडली.

पुजा ओमप्रकाश तिवारी (वय २८, रा. नवनीतनगर, वाडी) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पुजा वाडी- हिंगणा रस्त्यावरील अजमेरा टायर्स येथे नोकरी करत होती. वर्षभरापासून ती येथे अकाउंटंटचे काम करत होती. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी आपल्या अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून निघाली. त्यावेळी महामार्गावरून तिच्या मागून ट्रक (एमएच १२ एमव्ही ४६००) हा ट्रक आला. ट्रकच्या पाठीमागे लोखंडी हुक होते. त्या हुकला तिची ओढणी अडकली. त्यानंतर तिचा तोल गेला आणि ती मागच्या चाकाखाली आली. ट्रकने तिला चक्क ३० मीटरपर्यंत फरफटत ओढत नेले. तिने हेल्मेट घातलेले होते. त्याचाही चक्काचूर झाला. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकऱणी पोलिसांनी शिवलाल रामप्रसाद शिंदे (वय ३०, रा. टाकळखेड, ता. चिखली, बुलडाणा) याला अटक केली आहे.

पुजाचे वडिल मुळचे बिहारचे आहेत. ते नागपूरात ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी करतात. पुजाला एक भाऊ आहे. पुर्वी ती सेवा ऑटोमोबाईल्समध्ये नोकरी करत होती. त्यानंतर वर्षभऱापुर्वी ती अजमेरा टायर्समध्ये काम करत होती. तर शिवलाल शिंदे हा ट्रकमध्ये टीसीआय एक्सप्रेसमधून साहित्य घेऊन ओडीशाला जात होता.