धक्कादायक ! मुलगी झाल्यानं उपाशी ठेवलं, महिलेचा मृत्यु

रिवा : वृत्त संस्था  – मुलीचा जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या मध्य प्रदेशात एका विवाहितेच्या मृत्युने मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याने सासरच्यांनी मुलीच्या आईचे खाणे पिणे बंद केल्याने ७ दिवसांनी तिचा तडफडून मृत्यु झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि सासऱ्याचा अटक केली आहे.

मध्य प्रदेशातील रिवा गावातील मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरा येथे हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, राधा साहू (वय २३) आणि संजीव साहू यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर अडीच वर्षापूर्वी तिने मुलीला जन्म दिला. सासरची मंडळी वंशाला दिवा हवा म्हणून मुलाला जन्म देण्यासाठी राधावर दबाव टाकत होते. दुसऱ्या वेळी मुलगा होईल अशी सासरच्या लोकांना आशा होती पंरतु, राधाला नशिबाने साथ दिली नाही. दोन महिन्यांपूर्वी तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. दुसरीही मुलगीच झाल्याचे पाहून सासरकडच्यांनी तिचा छळ सुरु केला.

त्यांनी तिचे खाणे पिणे बंद केले़ दररोज मारहाण सुरु झाली. खाणे पिणे बंद झाल्याने व मारहाणीमुळे तिची प्रकृती खालावली. आठवडाभरापूर्वी तिची प्रकृती आणखीनच खालावली. मुलीवर अमानुषपणे अत्याचार केला जात असल्याची माहिती मिळाल्यावर तिचे वडिल जनमोहन साहू यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी झाले होते. परिणामी संसर्ग वाढला आणि ती शरीराने बारीक झाली होती. संसर्ग वाढल्याने तिचे महत्त्वपूर्ण अवयव निकामी झाले होते. अखेर तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी तिचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

Visit : Policenama.com